१८५३ साली नेदरलंड मध्ये जन्म झालेला vincent Van Gogh चित्रकलेच्या क्षेत्रात फारच नवीन संकल्पना आणि क्रांतिकारी विचार घेऊन आला. जन्मता:च चित्रकलेची दैवी देणगी घेऊन आलेल्या van gogh ला अनेक हालअपेष्टा, कुचंबणा आणि सामाजिक अवहेलना अनुभवास आली. सतत मानसिक हिंदोळ्यावर डोलणारा vincent कधीही मनाने स्थिर न्हवता; त्याची ती तळमळ मानसिक उलझन फक्त चित्रातूनच व्यक्त होत असे. आहे तसे, आणि जसे दिसते तसे कॅनवासवर रंगवण्यात त्याला कधीच रस नसे. आपल्या मनाला भावते तसे तो चित्रित करुन त्यात रंग भरत असे.
चित्रकाराच्या मनातील वादळ ब्रशच्या सहाय्याने समर्पक रंगसंगती वापरुन जेव्हा बघणारयाच्या मनाचा ठाव घेते तेव्हाच ते चित्र सजीव होते असे Van Gogh ला वाटत असे. त्याच्या हयातीत फक्त एकच चित्र आणि काही रेखाटने विकली गेली. थिओ नावाच्या त्याच्या भावाने त्याला सतत प्रोह्त्सहान आणि आर्थिक मदत केली, पण अमाप यश ह्याची देही ह्याची डोळा बघणे Van Gogh च्या नशिबी न्हवते; हवे ते देण्यापेक्षा आपल्यातल्या सृजनास कॅनवासवर चितारणे त्याला जास्त प्रिय होते. सवंग प्रसिद्धीच्या कधीही मागे न लागता Van Gogh या क्षेत्रात प्रचंड काम करून गेला. आई आणि भावाला लिहिलेली त्याची पत्र देखील अभिजात साहित्याचाच नमुना म्हणावी लागतील. थिओ नेहमी म्हणत असे, तो जे बोलतो त्याने एकतर लोकं त्याच्या प्रचंड प्रेमातच पडतात नाहितर त्याचा पूर्णपणे तिरस्कार तरी करतात. मधली कुठलीही शेड त्यात मिसळूच शकत नाही. त्याच्यातला तो वेडेपणा आणि पराकोटीचा एकलकोंडेपणा तो नवीन कलाकृती निर्मिण्यात ओतत होता. अनेक वेळेला मळकट शेतकऱ्याचा वेश घालून दिवसोदिवस गव्हाच्या शेतातून चित्र काढण्यात तो मनापासून रमत असे. अनेक विस्तीर्ण गवताळ कुरणे, सूर्यास्ताची वेळ; शेतावर काम करणारे गावकरी-मजूर, आकाशात झेपावणारी पाखरे, अशी अत्यंत मनोहारी निसर्गचित्रे त्याने काढली. तांत्रिकदृष्ट्या काही तृटी राहिल्या तरी त्याची पेंटिंग अभावितपणे मनातली तार छेडत बघणाऱ्याच्या काळजाला भिडत होती. ( His incorrectness in paintings used to make it look so much appealing that immediately a viewer could establish a strong connect with his Art and could capture the exact mood and feelings of the painter )
The Potato Eaters हे १८८५ साली काढलेले oil painting पुढे फार प्रसिद्ध झाले. प्रथमच आत्मविश्वासाने जगास दाखवलेली हीच ती जगप्रसिद्ध कलाकृती. त्याच्यामते हेच त्याचे सर्वश्रेष्ठ चित्र होते; थिओला हे पेंटिंग खास सोनेरी कोंदणात बसवण्यास त्याने सांगितले, पण त्याकाळी ह्या चित्रात कुणालाच काही खास वाटले नाही. त्याने मुद्दामहून अंधुकशा प्रकाशात मळकट कपड्यात दमलेल्या चेहऱ्याची माणसे साधे बटाटे उकडून खातात, आणि तिही त्यांना मेजवानी असते; अशा एका गरीब शेतकरयाचे कुटुंब जिवंत केलेय. चित्रातून त्यावेळच्या परिस्थितीवरचे भाष्य फारच बोलके आहे. त्याकाळच्या चिकित्सकांनी अव्हेरलेली, आज हीच त्याची अजरामर कलाकृती म्हणून सारे जग ओळखते.
पुढे त्याने अनेक प्रयोग केले; लाल आणि हिरव्या रंगातून माणसातील passion व्यक्त केली. चेहरे तर तो कधी हिरवे तर कधी नारिंगी रंगवत असे. त्यावेळच्या त्याच्या मानसिकतेवर ते अवलंबून असे. सोनेरी न संपणारी गवताची कुरणे; त्यावर हळुवार पसरलेल्या सूर्यप्रकाशाची अगणित चित्रे त्याने काढली. त्याच्या एकूण करीयरमधला अत्युच्य शिखरकाळ ती दर्शवतात. त्या काळात त्याने अनेकानेक सुंदर चित्रे निर्माण केली. निसर्गचित्रातले सौंदर्य आणि रंग तर केवळ अप्रतिम. अतिशय जवळून त्याची चित्रे पहिली तर त्यातील गती, बिंदू, लाटांप्रमाणे निर्माण झालेल्या रेखा, आडव्या-उभ्या रेषा त्याच्या मनातली वादळ दाखवून जातात; हीच त्याच्या चित्रातील खरी ताकत आहे.
मनोरुग्ण म्हणून लांब सुधारगृहात ठेवले असताना त्याने एक खूप सुरेख oil painting काढले. खिडकीतून बाहेर दिसणारे सुंदर-सुंदर फुलांचे ताटवे रंगवलेले ( Irises ) एकमेव पेंटिंग त्याच्या पूर्ण हयातीत विकले गेले. मनाच्या गाभ्यातून त्या फुलांचे सौंदर्य टिपत सुधारगृहाच्या खिडकीतून दिसणारी फुले त्याने चित्रात जिवंत केली.
त्याच्या घरी समवैचारिक म्हणून आलेल्या गौगेन ह्या चित्रकारासोबत सुरवातीचे काही दिवस एकत्र चित्र काढण्यात, वाईन पिण्यात आणि हास्य मनोरंजनात चांगले गेले, पण नंतर त्यांचे अजिबात पटेना; Van Gogh चा ओंगळपणा आणि विचित्र स्वभाव त्यास पचनी पडेना; त्यांच्यातला वाद विकोपास गेला, त्याच्या जाण्याने Van Gogh आभासी दुनियेत जाऊ लागला, त्यास विचित्र भास होऊ लागले. त्याच वेडेपणाच्या झटक्यात त्याने आपला कांन कापला, एका कागदात गुंडाळून कुंटणखाण्यातील मैत्रिणीला देत माझी आठवण ठेव आणि ह्याची काळजी घे असे सांगून निघून गेला. गौगेनच्या जाण्याने जणू ह्या संपूर्ण घटनाक्रमात अणकुचीदार खंजीराची भूमिका बजावली. वर्तमानपत्र सांगतात त्या हिशोबाने ही घटना १८८८ साली घडली. पोलिसांनी त्याच्या राहत्या घरून त्याला दवाखान्यात हलवले. नंतरचा त्याचा प्रवास हा अत्यंत जिवघेणा आणि त्रासदायक ठरला. ऐन तारुण्यात त्याची मानसिक उतरण चालू झाली; त्यातच इतकी वर्ष आर्थिक मदत देणारा थिओ स्वताच्या वाढणाऱ्या कुटुंबामुळे त्यास दीर्घकाळ मदत करण्यास असमर्थ ठरला. अखेरच्या काही पत्रामध्ये आपले वेडसर जीवन व आचरण आपल्यातील सृजनशील कलाकाराला त्याने अर्पित केले आणि ते सर्व कलेस जागृत ठेवण्यासाठी होते, असे त्यास वाटत असे. काहींच्या मते त्याने स्वतावर गोळी झाडली; तर काहींच्या मते आसपासच्या माणसातल्या कुणाकडून तरी वादविवादात चुकून ह्याच्यावर गोळी झाडली गेली. समाजाकडून बहिष्कृत झालेला, कधीही जिवंतपणी मानसन्मान न मिळालेला van gogh आज जगातील एक सर्वोत्तम चित्रकार म्हणून नावाजला जातो, जगभर दिमाखात त्याची चित्रे म्युझियम मध्ये भाव खाऊन जातात; जाहिर लिलावात प्रचंड मोठ्या किमतीस विकली जातात. आज अभिमानाने Van Gogh चे नाव त्याच्या देशात घेतले जाते.
भोवतालच्या समाजातून जादुई स्पर्शाने त्याने असंख्य गोष्टी टिपत आपल्या कलेच्या माध्यमातून एक स्वतंत्र कोलाज निर्माण केले. १८९० साली खूपशी रेखाटने, पत्रे, oil paintings, आणि निराश मन मागे ठेवून Vincent क्षितीजापल्याड नवीन सृष्टी चितारण्यास निघून गेला.
सोनाली चितळे
sonalischitale@gmail.com